ऑरेंज झोनमध्ये असलेल्या बेळगाव जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आल्यामुळे आज सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनच्या समाप्तीनंतरच्या पहिल्या दिवशी शहर परिसरातील दारू दुकानांसमोर तळीरामांची एकच गर्दी झाली होती. तब्बल 40 दिवसांनंतर दुकाने खुली केल्यामुळे कांही दारू दुकानदारांनी “बोहणी” करणाऱ्या आपल्या पहिल्या ग्राहक राजा तळीरामाचे चक्क पुष्पहार घालून स्वागत करत आनंद व्यक्त केला.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आणखी दोन आठवडे लाॅक डाऊन वाढविण्यात आला असला तरी बेळगावसह राज्यातील ऑरेंज झोनमध्ये असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये आज सोमवार दि. 4 मे पासून दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. यासाठी दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चा कालावधी देण्यात आला आहे तब्बल 40 दिवसांनंतर दारू दुकाने खुली करण्यात येणार असल्यामुळे सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील दारू दुकानांसमोर तळीरामांची गर्दी होताना दिसत होते. या प्रकारे गर्दी होणार हे लक्षात घेऊन दारू दुकानदारांनी काल रविवारी नियमाला धरून सुलभपणे दारूविक्री करता येईल या दृष्टिकोनातून आवश्यक ती पूर्वतयारी केली होती. दुकानासमोर सोशल डिस्टन्ससिंगच्या खुणा करण्याबरोबरच बहुतांश दारू दुकानदारांनी ग्राहकांच्या रांगेसाठी बांबू वगैरे लावून तात्पुरते बॅरिकेड्स ही तयार केले होते.
दारू दुकानदारांनी या पद्धतीने दारू विक्रीची तयारी केली असल्यामुळे आज सकाळपासून शहरातील प्रत्येक दुकानासमोर तळीरामांचा लांबच्यालांब रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. गेल्या 40 दिवसांपासून दारूने घसा ओला झाला नसल्यामुळे बैचैन झालेल्या बहुतांश तळीरामांना काल रात्रीपासूनच दारूचे वेध लागले होते. त्यामुळे आज सकाळी – सकाळी या मद्यपींनी नजीकचे दारू दुकान गाठून दुकान उघडण्याची वाट बघत त्याठिकाणी मुक्काम ठोकला. काहीजणांनी तर बस – रेल्वेमधील आसनांप्रमाणे चपला, पिशव्या वगैरे ठेवून दारू दुकानासमोरील रांगेतील आपापल्या जागा आरक्षित करून ठेवल्याचे दिसून येत होते. तसेच प्रत्येक जण दारूचे दुकान केंव्हा एकदा उघडते याची आतुरतेने वाट पाहताना दिसत होता.
दारुसाठी तहानलेल्या तळीरामांप्रमाणेच आपले दुकान उघडून केंव्हा एकदा आपल्या व्यवसायाला सुरू करतो असे दारू दुकानदारांना झाले होते. गेले 40 दिवस दुकान बंद ठेवण्यात आल्यामुळे दारू दुकानदारा नाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे सोमवार 4 एप्रिलपासून दारू दुकाने उघडी करण्यास परवानगी मिळाल्यामुळे अर्थांजन सुरु होणार असल्यामुळे दारू दुकानदारांमध्येही आनंद व्यक्त होताना दिसत होता. यासाठी शहरातील कांही दारू दुकानदारांनी दुकान उघडल्यानंतर प्रथम दारू खरेदी करणाऱ्या बोलीभाषेत “बोहणी” करणाऱ्या पहिल्या ग्राहकाचे चक्क पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. दरम्यान दारू दुकाने खुली झाल्यामुळे प्रत्येक मद्यपींमध्ये समाधान व्यक्त होत असून तशी प्रतिक्रिया अनेकांनी “बेळगाव लाईव्ह” समोर व्यक्त केली
दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्यामुळे दारू दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात मद्यपींची गर्दी होणार हे लक्षात घेऊन पोलीस खात्याकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून दारू विक्री होईल यासाठी दुकानदारांसह पोलीस कर्मचारी परिश्रम घेताना दिसत होते. सकाळी दारू दुकाने उघडताच कांही ठिकाणी प्रारंभी दारू मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये एकच चढाओढ निर्माण होऊन काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि दारु दुकानातील कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी गोंधळ घालणार्या मद्यपींना समज दिली. तसेच त्यांना सामाजिक अंतर ठेवून व्यवस्थित रांगेत उभे केले. लॉक डाऊननंतरचा पहिलाच दिवस असल्यामुळे प्रत्येक दारू दुकानासमोर मद्यपींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे बहुतांश दारू दुकानांमध्ये दारूचा साठा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.