हालगा (ता. बेळगाव) गावातील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरीला गेलेली बैलजोडी सुमारे 1 लाख रुपये किंमतीची आहे.
चोरीला गेलेली बैलजोडी बस्ती गल्ली हालगा येथील भरमा धर्मंत मुलीमनी या शेतकऱ्याच्या मालकीची आहे. हालगा – अलारवाड मार्गावर भरमा मुलीमनी यांची शेत जमीन आहे. कृषी साहित्य, अवजारे आणि जनावरे बांधण्यासाठी मुलीमनी आपल्या शेतात घर बांधले आहे. काल बुधवारी सायंकाळी शेतीचे कामे आटोपल्यानंतर बैलांना शेतातील घरात बांधून भरमा मुलीमनी आपल्या घरी परतले होते.
त्यानंतर आज सकाळी ते नेहमीप्रमाणे शेताकडे गेले असता बैल चोरीला गेल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बुधवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान आपली बैले चोरण्यात आली असावीत असा मुलीमनी यांचा अंदाज आहे.
भरमा मुलीमनी यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी ही बैलजोडी लहान असताना खरेदी केली होती. त्यानंतर आजतागायत या बैलजोडीची त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली होती. अलीकडेच या बैलजोडीतील एका बैलाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी 10 -15 हजार रुपये खर्च केले होते. बैलांचे वय होत चालले असल्यामुळे अनेकांनी मुलीमनी यांना बैले कसायाला विकण्याचा सल्ला दिला होता. तथापि पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले असल्यामुळे भरमा मुलीमनी या बैलजोडीचा सांभाळ करत होते. बैलजोडी चोरीप्रकरणी बागेवाडी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.