शहरातील नागरी समस्यांसह वाढीव घरपट्टी संदर्भात माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेअंती सरकारचा आदेश असल्यामुळे घरपट्टी संदर्भात आपण कांही करू शकत नाही. मात्र नगरसेवकांची मागणी आपण सरकार पर्यंत पोहोचू, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.
शहरातील विविध नागरी समस्यांच्या निवारणासह प्रामुख्याने वाढीव घरपट्टी मागे घ्यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वीच माजी नगरसेवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी माजी नगरसेवक संघटनेच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी त्यांना भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी दुपारी मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्यांबाबत चर्चा केली. याखेरीज वाढीव घरपट्टीला विरोध दर्शवून सध्याची प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन ही घरपट्टी मागे घ्यावी अशी मागणी केली.
यावेळी मनपा आयुक्त जगदीश यांनी माजी नगरसेवकांची बाजू ऐकून घेतली. नागरी समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तथापि राज्य सरकारच्या आदेशावरून घरपट्टी वाढ करण्यात आली असल्यामुळे त्यासंदर्भात मात्र आपण कांहीही करू शकत नाही, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे “वाढीव घरपट्टी मागे घ्यावी” ही माजी नगरसेवकांची मागणी आपण निश्चितपणे सरकारपर्यंत पोहचवू असे आश्वासन आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिले. याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सरिता पाटील, विजय मोरे, माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी, रेणू किल्लेकर, रणजित चव्हाण -पाटील, संभाजी चव्हाण आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.