माजी नगरसेवक संघटना बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन महापालिकेने केलेली घरपट्टी वाढ, विद्यार्थ्यांची फी आदींबाबत चर्चा करण्यात आली.
बेळगाव सर्किट हाऊस येथे जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याशी आज सकाळी झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीची माहिती देऊन ही अन्यायकारक वाढ दूर करावी, अशी मागणी केली. बेळगाव महापालिकेने घरपट्टी 15 टक्क्या ऐवजी 25 टक्के इतकी वाढविले आहे. त्यात सर्व्हिस टॅक्सच्या नावाने मोठी वाढ करून चलने दिली आहेत. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे सध्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेंव्हा ही अन्यायकारक घरपट्टी वाढ तात्काळ मागे घेणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यासंदर्भात माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर महापालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीबाबत आपण संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री शेट्टर यांनी दिले. त्याचप्रमाणे घरपट्टी मध्ये पाच टक्के सूट देण्याच्या योजनेचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यात यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या या मताला उपस्थित केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी देखील संमती दर्शविली.
संघटनेचे गौरव अध्यक्ष सिद्धनगौडा पाटील, अध्यक्ष अॅड. नागेश सातेरी आणि सेक्रेटरी दीपक वाघेला यांनी संघटनेची बाजू मंत्रीमहोदयांनी समोर मांडली. घरपट्टी वाढीबरोबरच विद्यार्थ्यांची फी व अन्य कांही विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, विजय मोरे, किरण सायनाक, बसाप्पा चिक्कलदिनी, सौ. सरिता पाटील, संज्योत बांदेकर, नीलिमा चव्हाण, उपमहापौर कल्लाप्पा प्रधान, ॲड. धनराज गवळी, नगरसेवक संजय प्रभू, संभाजी चव्हाण,आदी उपस्थित होते.
आपल्या संघटनेने आज केलेल्या प्रयत्नाला निश्चितच यश मिळवून लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत माजी महापौर ॲड. नागेश सातेरी व सिद्धनगौडा पाटील यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तसेच पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची थोडक्यात माहिती दिली.