कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेतली तर ते बरे होऊ शकतात. मी 29 दिवस कुटुंबापासून दूर होतो सुरुवातीला भीती वाटली. मात्र वडील डाॅ. विजय देसाई यांच्या प्रेरणेमुळे कोरोना रुग्णांची सेवा करू शकलो, असे डॉ. देवदत्त देसाई यांनी सांगितले.
बीम्स हॉस्पिटलमधील विशेष कोरोना कक्षात 15 दिवस सेवा बजावून डॉ. देसाई यांनी कांही रुग्णांना बरे करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलमधील 15 दिवसांच्या सेवेनंतर त्यांना 14 दिवस स्वतःचे काॅरन्टाईन करावे लागले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणे हा नवाच अनुभव होता. कोरोनाची बाधा झाली तरी पुरेशी खबरदारी घेतली तर कोरोनापासून मुक्त होता येते, असे स्पष्ट करून कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार दिला जात आहे. कोरोनाग्रस्तांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेतली तर ते बरे होऊ शकतात. हा अनुभव इतर रुग्णांना आल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आली असल्याचे डॉ. देवदत्त देसाई यांनी स्पष्ट केले.
मला गेल्या 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कोरोना विशेष कक्षामध्ये सेवा बजावण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीला मनात भीती निर्माण झाली होती. परंतु आपण व्यवसायाने डॉक्टर असल्याने घाबरून चालणार नाही. तू सेवा करत रहा, असा सल्ला वडिलांनी देत माझा आत्मविश्वास उंचावला, अशी माहितीही त्यांनी दिली. ही सेवा सुरू करण्यापूर्वी कोरोना रुग्ण कसे हाताळावेत? पीपीई किटचा वापर कसा करावा? औषधे घेण्यासाठी रुग्णांचे मन परिवर्तन कसे करावे? याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
जेंव्हा कोरोना रुग्णालयात पोहोचलो, त्यावेळी रुग्णांची संख्या 48 होती. त्यानंतर 30 एप्रिल पर्यंत ती 85 वर गेली, आता 121 वर गेली आहे. कोरोना विशेष कक्षात जाण्यापूर्वी डॉक्टरांना नाश्ता, जेवण व नैसर्गिक विधी उरकूनच पीपीई किट घालावे लागते. एकदा पीपीई कीट घातले की पुन्हा बाहेर पडेपर्यंत कोणत्याच क्रिया करायला परवानगी नसते, अशी माहितीही डॉ. देवदत्त देसाई यांनी दिली.