पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. तेंव्हा तत्पूर्वी मागील वर्षी पुरामुळे नुकसान झालेल्या शहरातील विशेषतः अनगोळ येथील गोरगरिबांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संबंधित नुकसानग्रस्तांच्यावतीने माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अनगोळ येथील प्रभाग क्र. 6 चे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षीच्या पूर पीडितांनी उपरोक्त मागणीचे निवेदन शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. गेल्यावर्षी जुलै-ऑगस्ट 2019 मधील पूर परिस्थितीप्रसंगी ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी रितसर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे.
पुरामुळे नुकसान झालेले लोक हे अतिशय गरीब असून हमाली करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. स्वतःच्या मालकीची घरे पुरामध्ये उध्वस्त झाल्यामुळे हे लोक सध्या भाड्याच्या घरात राहात आहेत. याचा गैरफायदा घेऊन घर्मालक त्यांच्याकडून अवाच्यासव्वा घरभाडे उकळत आहे.
नुकसानग्रस्तांपैकी कांही लोकांना नुकसानभरपाईचा पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे. परंतु त्यानंतर शिल्लक उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे कांही जणांना तर सरकारकडून नुकसान भरपाई दाखल साधी फुटकी कवडीही मिळालेली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे चौकशी केल्यास या लोकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तेंव्हा या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून संबंधितांना त्यांची नुकसानभरपाईची रक्कम त्वरित दिली जावी. जेणेकरून ते येत्या पावसाळ्याला तोंड देऊ शकतील, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.