कर्नाटक राज्यात मंगळवारी एका दिवशी 149 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यापैकी तब्बल 106 जण मुंबई रिटर्न असल्यामुळे हे मुंबई कनेक्शन राज्याला धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने 149 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1395 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने 24 तासात मंड्या जिल्ह्यातील तब्बल 71 जणांना आपल्या विळख्यात घेताना तेथील प्रशासनाला जबरदस्त तडाखा दिला आहे.
कर्नाटक आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने मंगळवार दि. 19 मे 2020 रोजी दुपारी जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 149 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून तर आणखी तिघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील कोरोना मृतांची संख्या आता 40 झाली आहे. मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू पावलेले तिघेजण बेळ्ळारी, विजयपुरा व बेंगलोर येथील आहेत. राज्यातील कोरोना बाधित यांची एकूण संख्या 1,395 झाली असून ऍक्टिव्ह कॅसिस 811 आहेत. उपचारांती पूर्णपणे बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत 543 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात नव्याने आठवून आलेल्या 149 रुग्णांपैकी 71 कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मंड्या जिल्ह्यातील आहेत. यामुळे मंड्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 171 झाली आहे. नव्याने रुग्ण आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये मंड्या व्यतिरिक्त दावणगिरी (22), शिमोगा (10), कलबुर्गी (13), बेंगलोर व चिकमंगळूर प्रत्येकी (6), उडपी व कारवार प्रत्येकी (4), हासन (3), बागलकोट (5) आणि गदग, यादगीर, विजयपुरा, चित्रदुर्ग, रायचूर व बिदर (प्रत्येकी 1) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, कर्नाटक राज्यात मंगळवारी एका दिवशी आढळून आलेल्या 149 कोरोनाबाधित रुग्णांपैकी तब्बल 106 जण मुंबईहून आलेले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसात राज्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. काल सोमवारी राज्यात जे 99 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी सुमारे चक्क 64 जण मुंबईहून कर्नाटकात आलेले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या रविवारी 17 मे रोजी राज्यात आढळून आलेल्या 55 रुग्णांपैकी 40 रूग्ण आणि तत्पूर्वी शुक्रवारी 15 मे रोजी 69 पैकी 23 कोरोना बाधित रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. ही एकंदर आकडेवारी लक्षात घेता कोरोनाने ग्रासलेल्या मुंबईचे कनेक्शन कर्नाटकसाठी धोकादायक ठरले आहे.