गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती ने आमची स्वप्न उद्ध्वस्त केली आणि यंदा तशाच नुकसानीचा सामना करत असताना आता “कोरोना”च्या शापाने आमचे जगणे मुश्कील करून टाकले आहे, हे निराशाजनक उद्गार आहेत बेळगाव शहरासह जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचे.
कोरोना विषाणूची दहशत आणि देशव्यापी लॉक डाऊनमूळे किमान यंदाच्या प्रत्येक सणासुदीच्या काळात कांही ना कांही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटासह कोरोनाच्या जीवघेण्या दहशतीची काळी छाया येत्या ऑगस्ट अखेर साजऱ्या होणाऱ्या बेळगावच्या वैभवशाली गणेशोत्सवावर पडण्याची शक्यता आहे. सध्याची प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन बरेच गणेश मूर्तिकार जे जास्त करून कुंभार जातीतील आहेत त्यांनी मूर्ती व्यवसाय सोडवून उदरनिर्वाहासाठी अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.
गेल्यावर्षी ऑगस्ट 2019 मध्ये पुराच्या पाण्याने सुमारे 3.5 लाख पर्यावरण पूरक गणेश मूर्ती नष्ट झाल्यामुळे कोन्नूर (ता. गोकाक) गावातील कुंभार जातीच्या सुमारे 300 कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न बुडाले होते. कोहिनूर हे कुंभार जातीचे राज्यातील सर्वात मोठे श्री गणेश मूर्ती बनविणारे केंद्र आहे. या गावातून कर्नाटकसह महाराष्ट्र गोवा आणि आंध्र प्रदेश येथे श्री मूर्तींचा पुरवठा केला जातो. परंतु यंदा कोरोनाचे संकट कोन्नूर येथील मूर्तिकारांची अवस्था वाईटहून अधिक वाईट करण्यास कारणीभूत ठरत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश मूर्तिकार हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत गेल्यावर्षी मूर्ती व्यवसायासाठी काढलेले कर्ज त्यांना पूर परिस्थिती आणि कांही अन्य अपरिहार्य ञकारणास्तव फेडता आलेले नाही. या परिस्थितीत आता कोरोनाच्या धोक्याने आपल्यावरील आर्थिक संकटावर मात करण्याच्या मूर्तिकारांच्या आशेवर यंदा देखील पाणी फिरवले असून त्यांचे जगणे अधिक दयनीय करून टाकले आहे.
बेळगाव शहरात सुमारे 400 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून जी गणेशोत्सवासाठी दरवर्षी 5 फुटांहून अधिक उंचीच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याची ऑर्डर देत असतात परंतु कोरोना विषाणूच्या संकटामुळे यंदा 50 टक्क्यांहून अधिक ऑर्डर कॅन्सल होण्याची शक्यता असल्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार श्रीनिवासन लाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घरगुती गणेश मूर्ती व्यवसायाला देखील यंदा फटका बसणार आहे त्यामुळे मूर्तिकार श्री मूर्तींचा मर्यादित साठा तयार करत आहेत, अशी माहिती लाड यांनी दिली.
सध्या मूर्तिकारांना कच्च्या मालाचा तुटवडा भासत आहे. कारण वेगवेगळे रंग, सजावटीच्या वस्तू आदी विविध साहित्य जेथून खरेदी केले जाते ती मुंबई आणि पुण्यासारखी बाजारपेठ लॉक डाऊनमुळे बंद आहे. या सर्व अडचणी व अडथळ्यांसह आर्थिक संकटाला तोंड देत मुर्ती व्यवसाय पुढे चालू ठेवणे मूर्तिकारांना कठीण जात असल्याचेही मूर्तिकार श्रीनिवास लाड यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साधेपणाने साजरा करावा. ज्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या जिल्हा प्रशासनाच्या लढ्याला मदत होईल. श्री गणेश मूर्तीची उंची जास्तीत जास्त 5 फूट इतकी ठेवावी श्री मूर्ती आणण्यासाठी आवश्यक मोजक्या मंडळींनी जावे. तसेच मूर्ती विसर्जन देखील अशा मोजक्याच लोकांनी करावे. सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून पूजाविधी केले जावेत. यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची काही गरज नाही तो आपण कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुढच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो, असे आवाहन लाड परिवारातर्फे करण्यात आले आहे.