एक भाऊ 21 वर्षाचा तर एक भाऊ 18 वर्षाचा आहे. एका खाजगी गाडीवर वाहन चालक असलेल्या वडिलांचा 17 वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. मानसिक खच्चीकरण यामुळे आईचेही 8 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे दोघेही भाऊ निराधार होऊन बेळगावात मामाकडे आश्रयाला आले परंतु मामाची आर्थिक परिस्थिती देखील बेताची असल्यामुळे न खचता पडेल ते काम करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार या दोघा भावंडांनी केला आहे. हि कहाणी आहे मनोज व अभिषेक रायकर या निराधार परंतु निश्चयी स्वभावाच्या भावंडांची.
प्रामाणिकपणे काम करून परिस्थितीशी लढा देणाऱ्यांपैकी एक असलेल्या मनोज व अभिषेक या दोघांचे वडील धारवाडहून उराशी मोठे स्वप्न बाळगून बेळगावात कामासाठी आले. बेळगावात एका खाजगी गाडीवर वाहनचालक असणाऱ्या मनोजच्या वडिलांचा 17 वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. वडिलांचे ज्या दिवशी निधन झाले त्या दिवशी मनोजचा तिसरा वाढदिवस होता. त्याचप्रमाणे अभिषेक तेंव्हा एक महिन्याचा होता. त्या दिवशीचा वाढदिवसाचा फोटो मनोजने अद्यापही जपून ठेवला आहे.
पतीच्या आकस्मिक निधनामुळे मनोजच्या बाळंतीण आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र तिने खचून न जाता एका गारमेंट कंपनीत काम करत दोन मुलांसह संसाराचा गाडा ओढण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने 8 वर्षापूर्वी तिचेही निधन झाले. त्यामुळे अनाथ झालेल्या मनोज व अभिषेक यांचा त्यांच्या मामाने सांभाळ केला. मात्र या निराधार भावंडांना मामाची आर्थिक परिस्थिती माहीत असल्यामुळे त्यांनी काम करत आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
सध्या मनोज व अभिषेक हिंदवाडी येथे एका भाडोत्री घरात राहतात, जेवणही स्वतः बनवतात. मनोज हा शहापूर येथे सराफ व्यवसायातील पास्ता मशीनवर काम करत आहे. धाकटा अभिषेक आरपीडी क्रॉस येथील एका पुष्प सजावटीच्या दुकानात काम करतो. अभिषेकने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यालाही पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. मनोज हा गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बीकॉम शेवटच्या वर्षात शिकत आहे. पुढे त्याला एमबीए करायचे आहे. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षा ही द्यावयाच्या आहेत. प्राप्त परिस्थितीचा मुकाबला करत प्रामाणिकपणे आयुष्याशी झुंज देणाऱ्या या भावंडांच्या मदतीसाठी समाजातून दातृत्वाचे हात पुढे येतील अशी अपेक्षा आहे.
Hello please share their mobile numbers.