परराज्यातील आपल्या मूळगावी जाण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने सीपीएड मैदानाशेजारील झाडाखाली कठीण परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या बेघर स्थलांतरितांच्या मदतीसाठी आता शहरातील नागरिक पुढे सरसावू लागले आहेत.
सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे उत्तर प्रदेशातील आपल्या मूळगावी जाण्यास अद्याप परवानगी न मिळालेल्या स्थलांतरितांच्या समस्यांसंदर्भात “बेळगाव लाईव्ह”ने आज सकाळी आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन बिकट परिस्थितीत सापडलेल्या स्थलांतरितांच्या मदतीसाठी शहरातील सेवाभावी नागरिक पुढे सरसावू लागले आहेत. भाग्यनगर येथील आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आनंद या युवकाने आज दुपारी सीपीएड मैदान येथे जाऊन झाडाखाली वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अन्सारी या उत्तर प्रदेशातील कामगारांची व त्याच्या कुटुंबाची भेट घेतली.
या स्थलांतरित कुटुंबातील लहान मुलांची चांगले अन्न मिळत नसल्याने परवड होत असल्याचे लक्षात घेऊन आनंद यांने या मुलांना बिस्किट, ब्रेड, केक, ज्यूस आदी खाद्यपदार्थ आणून दिले. यामुळे त्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे आनंद यांने कफल्लक अवस्थेतील मोहम्मद अन्सारी याला हात खर्चासाठी 500 रुपयांची मदत देऊ केली.
आनंद यांनी या पद्धतीने एक प्रकारे आपल्याला रमजान ईदची ईदीच दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून अन्सारी याने कृतज्ञता व्यक्त केली.
आनंद यांच्याप्रमाणेच आणखी कांहीजण सीपीएड मैदानाशेजारील झाडाखाली वास्तव्यास असणाऱ्या स्थलांतरितांच्या मदतीसाठी धावल्याचे रविवारी दुपारी पहावयास मिळाले. संबंधितांनी आपापल्यापरीने स्थलांतरितांना मदत केल्याचे समजते.