गोव्यातील एका मुलाने खेळता-खेळता गिळलेला चक्क 12 चुंबकांचा संच त्याच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर यशस्वी झाले आहेत. केएलई हॉस्पिटलचे पीडियाट्रिक सर्जन डॉ. संतोष कुरबेट, भुलतज्ञ डॉ. निकिता कल्याणशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोव्यातील एका मुलाने पालकांच्या नकळत खेळण्यातील चुंबक गिळले होते. ते चुंबक त्याच्या लहान आतड्यात जाऊन त्याला पोटात दुखू लागले. त्याचप्रमाणे त्याची पचनशक्ती बिघडली आणि त्याला जडत्व आले. मुलाला असह्य वेदना होऊ लागल्यामुळे पालकांनी त्वरित त्याला बेळगावला केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आणले. येथे बालरोग तज्ञ डॉ. संतोष कुरबेट यांनी त्याची चाचणी केली. त्याचा एक्स-रे काढण्यात आला आणि त्याच्या पोटात कांही धातू असल्याचे आढळून आले.
तेंव्हा पुढील धोका लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून शस्त्रक्रियेद्वारे त्या मुलाच्या पोटातून चक्क 12 लहान गोलाकार चुंबकांचा संच बाहेर काढला, आश्चर्य म्हणजे पोटात गेलेले हे चुंबक एकमेकाला चिकटण्याबरोबरच त्याच्या आतड्यालाही चिकटून राहिले होते.
हॉस्पिटलमध्ये सात दिवसांच्या उपचारानंतर त्या मुलाला परत घरी पाठवण्यात आले. पुन्हा चाचणीसाठी आल्यावेळी त्या मुलाच्या पालकांनी मुलगा आता ठिक असल्याचे सांगून डॉक्टरांचे आभार मानले. तेंव्हा डॉ. संतोष कुरबेट यांनी कोरोनाच्या काळात मुलांची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. उपरोक्त यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल केएलई हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. व्ही. जाली यांनी संबंधित डॉक्टरांसह त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. लॉक डाऊनच्या काळात डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली हे विशेष होय.