राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण बेळगाव महापालिकेच्या घरपट्टी वाढीचा मुद्दा उपस्थित करून घरपट्टी वाढ मागे घेतली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन पाटबंधारे मंत्री रमेश जारकिहोळी यांनी बुधवारी बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेला दिले.
माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी पाटबंधारेमंत्री रमेश जारकिहोळी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर बेळगाव महानगरपालिकेच्या अन्यायकारक घरपट्टी वाढीचा मुद्दा मांडला. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे सध्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कामधंदे बंद असल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती तर अधिकच वाईट आहे. यासाठी घरपट्टी वाढ केली जाऊ नये, खरे तर या वेळची घरपट्टी रद्दच करावी, अशी मागणी केली. तसेच महापालिकेने घरपट्टी वाढीमध्ये कशी अन्यायकारक वाढ केली आहे, याची माहिती माजी नगरसेवकांनी मंत्री रमेश जारकीहोळी यांना दिली.
यावर झालेल्या चर्चेअंती मंत्री रमेश जारकीहोळी यांनी वाढीव घरपट्टीचा हा मुद्दा आपण मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कानावर घालू शिवाय लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू. त्याचप्रमाणे वाढीव घरपट्टी रद्द करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.
नाले सफाई करण्याची मागणी :पावसाच्या अगोदर बेळगाव शहरातील नाले सफाई करून द्यावी अशी मागणी देखील माजीं नगरसेवकांनी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली.
बेळगाव मनपा कडे स्वतःचे हिताची जे सी बी नाहीत त्यामुळे भाडे तत्वावर घेऊन नाले सफाई करा अश्या सूचना जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केली.
याप्रसंगी माजी महापौर किरण सायनाक, विजय मोरे, सौ. सरिता पाटील, संज्योत बांदेकर, शिवाजी सुंठकर, बसप्पा चिक्कलदिनी आदींसह बरेच नगरसेवक उपस्थित होते.