कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात विदेशासह देशातील 14 ठिकाणांहून 767 व्यक्तींचे बेळगावात आगमन झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली असून यापैकी सर्वाधिक म्हणजे 607 जण एकट्या महाराष्ट्र राज्यातून आलेले आहेत.
देश-विदेशातून गेल्या दोन आठवड्यात बेळगावात आलेल्या 767 जणांपैकी 678 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून 27 जणांचे घरगुती विलगीकरण करण्यात आले होते. बेळगावात आगमन झालेल्यांपैकी 62 जण पुन्हा आपल्या राज्यात परत गेले आहेत. घरगुती विलगीकरण करण्यात आलेल्या 27 जणांचे स्वॅबचे नमुने प्रारंभी घेण्यात आलेले ते शुक्रवारी घेऊन त्यांचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. परराज्यातून बेळगावात येणार्यांचा ओघ गेल्या 9 मे पासून सुरू झाला यामध्ये जिल्ह्यापेक्षा बेळगाव शहरात येणाऱ्यांची संख्या जास्त म्हणजे तब्बल 667 इतकी आहे या सर्वांची नोंद महापालिकेकडे असून बेळगावात आलेल्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहता सर्वाधिक प्रवासी महाराष्ट्रातून आलेले आहेत. महाराष्ट्र मागोमाग गोवा, राजस्थान व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. सदर राज्यातून येणाऱ्यांची संख्या व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे गेल्या 18 मे रोजी या राज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी राज्यांमधून येणाऱ्यांची संख्या कमालीची घटली असून शनिवारी दुपारपर्यंत एकाही व्यक्तीची नोंद सीपीएड मैदानावरील नोंदणी कक्षात झाली नव्हती.
गेल्या दोन आठवड्यात परदेशातून तीन व्यक्ती बेळगावात आल्या असून त्यांची ही नोंद महापालिकेकडे आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, दादरा नगरहवेली व पांडेचेरी या केंद्रशासित प्रदेशातून देखील 8 जण बेळगावात आले आहेत. या सर्वांचेच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. याखेरीज चक्क जम्मू-काश्मीर तसेच हरियाणा व पंजाब येथून देखील प्रवासी आले असले तरी हे सर्वजण सेनादलातील जवान असल्याचे समजते.
दरम्यान, बेळगावात आलेल्या 767 जणांमध्ये महाराष्ट्र राजस्थान, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दादरा नगरहवेली, जम्मू-काश्मीर, पांडेचेरी, हरियाणा, पंजाब, दिल्ली व तामिळनाडू येथील प्रवाशांसह विदेशी प्रवाशांचा समावेश आहे.