Tuesday, November 19, 2024

/

रुग्णांच्या तुलनेत क्षमतेने कमी पडत आहे बेळगावची प्रयोगशाळा

 belgaum

बेळगावात गेल्या एप्रिल अखेर आयसीएमआर कोव्हीड – 19 प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील स्वॅब तपासणी अहवाल आता तात्काळ मिळणार असे सांगण्यात आले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता काॅरन्टाईन रुग्ण संख्येच्या तुलनेत ही आयसीएमआर कोव्हीड – 19 प्रयोगशाळा क्षमतेने कमी पडत असल्याचे सिद्ध होत आहे.

गेल्या 20 – 25 दिवसात देशाच्या विविध भागातून सुमारे 900 हून अधिक लोक बेळगाव शहरात आले आहेत. या सर्वांचे शहरासह तालुक्यामध्ये आणि स्वखर्चाने हॉटेलमध्ये इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले आहे. गेल्या एप्रिल अखेर बेळगावात आयसीएमआर कोव्हीड – 19 प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले आणि स्थानिक पातळीवर स्वॅब तपासणीचे अहवाल आता तात्काळ उपलब्ध होतील असे सांगण्यात आले होते. परंतु सध्या स्वॅब तपासणी अहवाल हाती येण्यास तब्बल 4 ते 6 दिवस लागत आहेत. यासंदर्भात इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन पूर्ण झालेल्यांनी तक्रार केल्यास स्वॅब नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळाल्याशिवाय तुम्हाला घरी जाता येणार नाही, असे सांगितले जात आहे. बऱ्याच जणांचे नमुने घेऊन चार-पाच दिवस उलटले तरी त्यांचा अहवाल आला नसल्यामुळे संबंधित रुग्णांना काॅरन्टाईन खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईनचा कालावधी संपला तरी स्वॅब तपासणी अहवालासाठी हॉटेलचे भाडे भरून राहावे लागत असल्यामुळे मंगळवारी एका हॉटेलमधील कांही रुग्णांनी “आमच्याकडे पैसे संपले आहेत. आता यापुढे आम्ही हॉटेलचे भाडू भाडे भरू शकत नाही”, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे गोंधळ उडाला मात्र पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करून त्या रुग्णांची समजूत काढली.

गेल्या कांही दिवसांपासून दिवसाकाठी 250 ते 270 तपासणीचे अहवाल उपलब्ध होत आहेत. मोठ्या प्रमाणात स्वॅबचे नमुने तपासणीस येत असल्यामुळे सर्वच प्रयोगशाळांवरील कामाचा ताण वाढला असल्याने तपासणी अहवाल उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसओपी समजून घेण्यात आणि त्याच्या स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीत मोठी कमतरता असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. एसपीओनुसार स्वॅबचे नमुने 12 व्या दिवशी घ्यावयाचे असतात, परंतु प्रत्यक्षात ते 14 व्या दिवशी घेतले जात आहेत आणि त्यानंतर तपासणी अहवाल देण्यासाठी 4 – 5 दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. कारण 14 दिवसांचा काॅरन्टाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण 15 व्या दिवशी घरी असू असे गृहीत धरलेल्या या मंडळींना प्रत्यक्षात 18 ते 20 दिवस काॅरन्टाईन केंद्रात राहावे लागत आहे. एसपीओनुसार इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन माफ असलेल्या गर्भवती महिला आणि अन्य ठराविक प्रवाशांची त्यांच्या आगमनाच्या वेळी तपासणी व्हावयास हवी परंतु तसे न होता 8व्या ते 10व्या दिवशी त्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.

आता सुधारित नव्या एसओपीनुसार 7 दिवसांच्या इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईनसाठी स्वॅबचे नमुने 5व्या ते 7व्या दिवसापर्यंत घेतले गेले पाहिजेत. तथापि जाणीवपूर्वक ते 7व्या दिवशी घेतले जात असून त्यांचा अहवाल येण्यास आणखी 3 – 4 दिवस लागत आहेत. त्यानंतर त्याला जोडून सात दिवसांचा होम काॅरन्टाईन त्यांचा कालावधी असतो. एकंदर हे सर्व पाहता काॅरन्टाईन रुग्णांच्या तुलनेत बेळगाव आयसीएमआर कोव्हीड – 19 प्रयोगशाळेची क्षमता कमी पडत असल्याचे सिद्ध होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.