मागील वर्षा पासून एपीएमसी ते कंग्राळी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र कंत्राटदाराच्या हेळसांड पणामुळे हे काम तातडीने होईल असे काही दिसत नाही. त्यामुळे एपीएमसी ते कंग्राळी खुर्द पर्यंत या रस्त्याचे ग्रहण सुटणार कधी? असा सवाल प्रवासी व येथील नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी निवेदने आंदोलने आणि आणि मोर्चे काढून देखील प्रशासनाला याची जाग आली नाही असे दिसून येत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकणे आहे तर छोटे-मोठे अपघात घडत आहेत. मागील वर्षभरापासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली खरी मात्र हा रस्ता का होईना. कंत्राटदार आपल्या मनमानी कारभारामुळे मनी येईल तेव्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात करतो आणि दोन दिवस झाले की पुन्हा ते रस्त्याचे काम बंद पाडतो.
त्यामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एपीएमसी ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याचे काम कधी एकदा पूर्ण होणार अशीच आशा साऱ्यांना लागून आहे. मात्र याचे सोयरसुतक प्रशासन व संबंधित कंत्राटदाराला नसल्याचे दिसून येत आहे. सध्या एकाच बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे तर दुसर्या बाजूला रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थितीत नागरिक व प्रवासी मुठीत जीव घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे आता प्रवाशांना डोकेदुखी वाटू लागला आहे. परिणामी एका रस्त्याच्या बाजूला खडी टाकून तब्बल दोन ते तीन महिने झाले.
मात्र रस्त्याच्या कामाला काय सुरुवात झाली नाही. आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसापूर्वी हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जर हा रस्ता तातडीने पूर्ण केला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी दिला आहे.