बेळगाव शहरातील कोरोना विषाणु प्रादुर्भाव आला आळा घालण्यासाठी लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहरात निर्जंतुकीकरणाची मोहीम यशस्वीरित्या राबविल्यानंतर आता कांगली गल्ली येथील युवकांनी थर्मल स्क्रीनिंग मशीनद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. बेळगावातील कार्यकर्त्यांकडून स्वखर्चाने राबविला जाणारा अशा प्रकारचा शहरासह जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
शहरातील कांगळी गल्ली येथील नारायणी नवरात्री उत्सव मंडळाच्या युवकांनी थर्मल स्क्रीनिंग मशीनद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम आज गुरुवार पासून सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळू तोपिनकट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभी कांगली गल्ली, मुजावर गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली आणि परिसरासह त्यानंतर संपूर्ण बेळगाव शहरात हा थर्मल तपासणी उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी कांगळी गल्लीतील युवकांनी 4 थर्मल स्क्रीनिंग मशिन्स खरेदी केली आहेत.
कांगळी गल्ली येथून गुरुवारी सकाळी या थर्मल स्क्रीनिंग तपासणी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची थर्मल तपासणी केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळू तोपिनकट्टी आणि सिद्धाप्पा भातकांडे यांनी या थर्मल तपासणीबाबत “बेळगाव लाईव्ह”ला अधिक माहिती दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या आतापर्यंतच्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत आम्ही शहरात स्वखर्चाने निर्जंतुकीकरणाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. याबरोबरच आता जिल्हा प्रशासनाच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा म्हणून आम्ही नागरिकांच्या शरीरातील तापाचे निदान करण्यासाठी थर्मल स्क्रीनिंगची मोहीम राबवत आहोत, असे सिद्धाप्पा भातकांडे यांने सांगितले. यावेळी या उभयतांनी कोरोना संदर्भातील नवनव्या घडामोडींच्या ताज्या बातम्या तत्परतेने लोकांपर्यंत पोचवून कोरोना विरुद्धच्या लढ्यास अधिक बळकटी देत असल्याबद्दल, त्याचप्रमाणे ग्राउंड लेव्हलला कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्यांचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहन देत असल्याबद्दल “बेळगाव लाईव्ह”ला धन्यवाद दिले.
दरम्यान, कांगळी गल्ली येथील युवकांतर्फे प्रथम त्यांच्या वॉर्डांमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण शहरात हा थर्मल स्क्रिनिंगचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज गुरुवारी प्राथमिक स्वरूपात या उपक्रमाला सुरुवात झाली असून उद्या शुक्रवार 24 एप्रिल पासून पूर्ण क्षमतेने जोरदारपणे सदर उपक्रम राबविला जाणार आहे. कांगळी गल्ली येथील युवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून इतरांनी देखील हा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले जात आहे.