संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे धास्ती असताना अनेकांना योग्य सोयी सुविधा मिळणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत देखील काही महत्वाच्या ठिकाणी कोरोना बाधितांसाठी अनेक हॉस्पिटल सज्ज करण्यात आले आहेत. मात्र इतर आजार झालेल्या रुग्णांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. अशीच घटना बेळगाव येथे घडली. एका महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली आणि तेथील नागरिकांनी माणुसकीही दाखवली.
वडगाव येथील एका महिलेची प्रसुती रस्त्यावर झाली. संबंधित महिलेला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला हॉस्पिटलकडे हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र काही खासगी हॉस्पिटल सध्या बंद असल्याने तिला इतरत्र नेईपर्यंत त्या महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली असली तरी आरोग्य खात्याने आता तरी शहाणे होण्याची गरज व्यक्त होत होती.
खाजगी हॉस्पिटलकडे नेण्यात येत असताना हॉस्पिटल ही बंद झाले होते. हट्टीहोळी गल्ली शहापूर येथील एका हॉस्पिटलकडे संबंधित महिलेला नेण्यात आले. मात्र ते हॉस्पिटल लहान बाळांचे असल्याने तेथे त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र संबंधित महिलेला अधिकच त्रास सुरू झाल्याने याच परिसरातील नागरिकांनी मोहन पवार यांच्या पुढाकाराने रस्त्यावरच प्रसूती केली. त्यांच्या या कार्याबद्दल माणुसकीचे दर्शन अजूनही जिवंत असल्याचे दिसून आले आहे.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा सारा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेचे बाळ आणि महिला सुरक्षित आहेत. त्यामुळे हट्टीहोळी गल्ली येथील नागरिकांच्या सहकार्याने मुलाला आणि मातेला योग्य वेळेत उपचार मिळाले. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत, असे संबंधितांचे नातेवाईक सांगू लागले आहेत.