सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे चार झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची घटना येळ्ळूर रोड येथे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
बेळगाव शहर परिसरात गुरुवारी दुपारनंतर पावसाने काहीकाळ हजेरी लावली होती. तथापि येळ्ळूर रोड भागात पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे रस्त्याशेजारी चार झाडे तुटून पडली. येळ्ळूर नजीकच्या गॅस गोडाऊन नजीक हा प्रकार घडला. झाडे कोसळली त्यावेळी पावसामुळे रस्त्यावर कोणी नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रस्त्यावर कोसळलेल्या झाडांमुळे येळ्ळूर रोडवरील रहदारी कांही काळ जवळपास ठप्प झाली होती. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे बाजूला काढून रस्ता रहदारीस मोकळा करण्याचे काम सुरू होते.
कोसळलेल्या झाडांपैकी काही झाडे विजेच्या तारांवर कोसळल्यामुळे तारा व खांब तुटून येळ्ळूर गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. विजेच्या तारांवर पडलेल्या फांद्या तोडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे हेस्काॅम कर्मचाऱ्यांचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.