खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथे मलप्रभा नदीवरील बंधारा बांधकामानजीक नदीच्या गाळात श्री दुर्गामाता व श्री हनुमान यांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तथापि याबाबत अद्याप पुरातत्व खात्याला माहिती देण्यात आलेली नाही.
खानापूर तालुक्यात वाहणाऱ्या मलप्रभा नदीवर वड्डेबैल येथे बंधारा बांधण्याचे सुरू असलेले काम सध्या लाॅक डॉऊनमुळे बंद आहे. काल शुक्रवारी कांही तरुण याठिकाणी अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नदीच्या पात्रातील गाळात प्रथम श्री दुर्गा मातेची मूर्ती सापडली. त्यानंतर उत्सुकतेपोटी शोध घेतला असता त्यांना आणखी दोन मूर्ती सापडल्या. या दोन्ही मूर्ती श्री हनुमानाच्या आहेत. सध्या नदीकाठावर एका ठिकाणी या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, याबाबत पुरातत्व खात्याला अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. सदर मूर्ती जीर्ण झाल्यामुळे नदीपात्रात सोडण्यात आल्या असाव्यात आणि आता पाण्याची पातळी खालावल्यामुळे “त्या” मूर्ती वर आल्या असाव्यात, असा जाणकारांचा अंदाज आहे.