बेळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी आणखी 18 कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 463 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे एका 10 वर्षाच्या मुलीला आणि 15 वर्षाच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 45 झाली आहे.
कर्नाटक राज्य शासनातर्फे शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त माहिती देण्यात आली आहे. रायबाग येथे आढळून आलेली पी – 448 क्रमांकाची दहा वर्षीय मुलगी पी -150 क्रमांकाच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाली आहे. त्याचप्रमाणे पी – 463 क्रमांकाचा 15 वर्षीय मुलगा पी – 148 क्रमांकाच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त बनल्याचे उघडकीस आले आहे. नव्याने हे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 45 झाली आहे.
दरम्यान, काल गुरुवार सायंकाळी पाच वाजल्यापासून आज शुक्रवार दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यात नव्याने आढळून आलेल्या 18 रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 463 झाली असून यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर 150 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात नव्याने आढळून आलेल्या 18 रुग्णांपैकी तब्बल 11 रुग्ण बेंगलोर शहरातील आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव आणि बागलकोट (मुधोळ व जमखंडी प्रत्येकी एक) जिल्ह्यातील प्रत्येकी 2 तसेच तुमकुर, चिकबेळ्ळापूर आणि विजयपुरा येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा नव्याने आढळलेल्या 18 रुग्णांमध्ये समावेश आहे.