पिरनवाडी (ता. बेळगाव) गावात अलीकडेच एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित गावातील टास्क फोर्स कमिटीची बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी मास्क आणि सॅनीटायझर वितरणाचा कार्यक्रमही पार पडला.
पिरनवाडी येथे अलीकडेच एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या गावाला कंटेनमेंट झोन (निर्बंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. पिरनवाडी निर्बंधित क्षेत्रातील शासनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा गुरुवारी झालेल्या टास्क फोर्स कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि. पं. शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल हे होते.
सदर बैठकीस किरण वाडी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश तळवार, ग्रा. पं. सदस्य महेश पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन गोरले, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, पिरनवाडी टास्क फोर्स कमिटीचे सर्व सदस्य अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होते. सामाजिक अंतराचा नियम पाळून पार पडलेल्या या बैठकीत नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी असलेली गावातील वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तूंची सेवा, गावातील स्वच्छता, सरकारच्या आदेशाचे आणि सूचनांचे गावातील नागरिकांकडून केले जाणारे पालन आदींचा आढावा घेण्यात आला.
आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल हे येळ्ळूर नंतर पिरनवाडी या कंटमेंट झोन मध्ये आरोग्या बाबत जनजागृती करत आहेत.
जि. पं. शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करत असल्याबद्दल पिरनवाडीच्या आशा कार्यकर्त्यांसह टास्क फोर्स सदस्याचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहीत केले. याप्रसंगी उपस्थित आशा कार्यकर्त्या आरोग्य कर्मचारी व टास्क फोर्स सदस्यांना रमेश गोरल यांच्या हस्ते सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.