रविवारपेठ धान्य विक्रेत्यांचे नियोजन किती बरोबर किती चुकीचे हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.रविवारपेठेतून अख्या बेळगाव जिल्ह्यातील दुकानदारांना होलसेल दरात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा होतो या भागातील लोडिंग अनलोडिंगसाठी अनेक ट्रक येत राहतात त्यांची वर्दळ इतकी होते की सध्याच्या काळातील सोशल डिस्टन्सचा पुरा बोजवारा उडतो. जर का प्रशासनाला भाजी मार्केट गावाबाहेर नेऊन योग्य प्रकारे वितरण करणे शक्य झाले, तर रविवार पेठेतील व्यापाऱ्यांचा आपल्या दुकानात बसून व्यापार करण्याचा अट्टहास का आहे?हा केवळ समाज उपयोगी पडण्याचा भाग नसून, आपल्या व्यापाराची या व्यापाऱ्यांना काळजी आहे.
जर या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या नियमाने वितरण करता येत नसेल, तर प्रशासनाने वितरण व्यवस्था हाती घ्यावी. अत्यंत महत्वाच्या जीवनावश्यक वस्तू व सरसकट व्यापारी वस्तू याची वर्गवारी करून नेमक्याच वस्तूंना परवानगी दिली जावी. सदर व्यापाऱ्यांनी पोलीस यंत्रणेचा अधिकचे पास घेऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण केलीच होती. पोलिसांनी केलेल्या सुसूत्रीकरणाला यांनी हरताळ फासला होता आता मंत्र्यांना मध्ये घालून सकाळी 10 ते दुपारी 2 अखंड व्यापारी कालखंड मिळवून पंतप्रधानानी देशाला केलेल्या आवाहनाला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
बेळगाव कोरोनाच्या बाबतीत डेंझरझोन मध्ये आलेलं असताना एका बाजूला खानापूर सारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणाने संयमाचे पालन करून आपला भाग ग्रीनझोन मध्ये नेला आणि त्याच्या उलट बेळगाव शहर आणि तालुका रेड झोन मध्ये आलेला असताना राजकारण्यांचा वापर करून आपल्या व्यापाराचा मार्ग सुखकर करण्याचा अश्लाघ मार्ग अवलंबला गेला हे जनहित कारी नाही याची चर्चा सुरू आहे.
रविवारपेठची गर्दी कितीही कुणीही काहीही म्हटलं तरी सोशल डिस्टन्स पाळणारी नव्हे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची गरज अश्यात या भागात होणारी गर्दी जीवघेणी आहे. अनेकांवर अव्वाच्या सव्वा रेट लावल्याचे आरोप होत आहेत त्यामुळे याचा फेरविचार होणं गरजेचं आहे.बेळगावच्या चार दिशेने चार झोन करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.सोयीपेक्षा, स्वार्थापेक्षा गाव वाचवणं गरजेचं आहे याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.