कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हायअलर्ट जारी करण्यात आला असताना बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोना पोझिटीव्ह केस न आढळल्याने जनतेने म्हणावं तितक मनावर घेतलं नव्हतं उलट भाजीमार्केट, तसेच शहरातील रविवारपेठ आणि मार्केट परिसरात गर्दी केली जात होती आणि सोशल डिस्टनसिंग चे तीनतेरा वाजले होते. मात्र लॉक डाउनच्या दहाव्या दिवशी म्हणजे शनिवारी तीन कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने बेळगावकरांनी धास्ती घेत स्वयं प्रेरणेने रस्ते बंद केले आहेत.
दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या तिघा जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने बेळगाव तालुक्यातील अनेक गावे तसेच शहरातील गल्लीन गल्ली झाडाच्या फांद्या टाकून, माती टाकून, बॅरकेड्स लावून स्वयंस्फूर्तीने नागरिकांनीच लॉकडाऊनचे पालन करण्याचे ठरविले असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश देण्यात येत नाही आहे.
यमनापूर सारख्या गावात तर गावात प्रवेश केलेल्यास 500 रुपये दंड असा फलक लावण्यात आला आहे. एकूणच लॉक डाउनचा अकरावा दिवस बेळगावात स्वयंस्फूर्तीचा लॉक डाउन झाला आहे त्यामुळं आगामी दिवसात लॉक डाउन काटेकोरपणे पाळला जाणार असेच चित्र सध्या तरी आहे.
तीन पोजिटिव्ह रुग्णांची धास्ती वाढल्याचे चित्र शनिवारी दिसत होतं तेच चित्र आणखी काही दिवस कायम राहील अशी शक्यता आहे.