बेळगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन गुड्स वाहनांसह सुमारे 15 हजार 535 रुपये किंमतीची बेकायदेशीर दारू बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केली असून याप्रकरणी एकूण 5 जणांना गजाआड केले आहे.
प्रमोद सिद्राय नागरोळी (वय 20), अमोल राजू पुजारी (वय 28, दोघे रा. बसरीकट्टी, ता. बेळगाव), महादेव मारुती घाणगेर (वय 32, रा. हारुगेरी ता. रायबाग) बालेश तळवार (वय 30 रा. रायबाग) आणि शहानुर राज गाडीवड्डर अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत. यापैकी प्रमोद व अमोल हे दोघे गुड्स वाहनातून विविध प्रकारच्या बेकायदा दारुच्या बाटल्यांची वाहतूक करत होते. हे गुडस् वाहन संतीबस्तवाड नाका येथे अडवून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सुमारे 4,555 रुपये किंमतीची बेकायदा दारू आणि गुड्स वाहन जप्त केले.
त्याचप्रमाणे पिरनवाडी नाका येथे वाहन तपासणीप्रसंगी एका गुड्स वाहनांमधून दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या महादेव, बाळेश व शहानुर या तिघाजणांना पोलिसांनी अटक केली. तसेच वाहनांमध्ये लपविलेली 10 हजार 980 रुपयांची बेकायदा दारू जप्त केली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.