शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील कांही हॉटेल्समध्ये कोरोना संशयित रुग्णांची कोरन्टाईनची सोय केली जाणार आहे. याबाबतची माहिती मिळताच रविवारी भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली परिसरातील शेकडो नागरिक, महिला व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी संबंधित हॉटेल्समध्ये कोरन्टाईन रुग्णांना ठेवण्यास विरोध दर्शविला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
तथापि पोलिसांना न जुमानता जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला. रेल्वे स्टेशन रोडवरील संबंधित 3 हॉटेल्समध्ये कोरन्टाईन रुग्णांना ठेवल्यास या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे तेंव्हा कोरन्टाईन केलेल्या रुग्णांना अशा भरवस्तीच्या ठिकाणी न ठेवता त्यांची शहराबाहेर व्यवस्था करावी. तसेच यासाठी खासदार सुरेश अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
गेल्या कांही दिवसांपूर्वी खासदार सुरेश अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी कोरोना बाबत जनजागृती करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने गल्लोगल्ली प्रमुखांची नेमणूक केली होती. आता हे उभयता कोठे आहेत? असा सवाल रविवारी भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली परिसरातील नागरिक करताना दिसत होते.
दरम्यान स्टेशन रोडवरील हॉटेल्समध्ये ठेवण्यास विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेकडो नागरिक, महिला व कार्यकर्त्यांमुळे वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले होते. संतप्त बनलेल्या या लोकांना नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना काहीजणांना लाठीचा सौम्य प्रसादही द्यावा लागला. रेल्वे स्टेशन मार्गावर रविवारी दुपारी उशिरापर्यंत संतप्त नागरिक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले. कोरन्टाईन रुग्णांना आपल्या भागात ठेवण्यात येऊ नये यासाठी भांदुर गल्ली ताशिलदार गल्ली भागातील कार्यकर्त्यांनी लाकडाचे ओंडके व बाकडी टाकून रस्ताही अडविला होता.