कोरोनाच्या विषयी जनतेत सदैव जनजागृती करत असलेल्या माध्यम प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांच्यासाठी वार्ता भवन येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था,रेड क्रॉस आणि वार्ता प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाशी संबंधित तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये ९२ व्यक्तींनी आपली तपासणी करून घेतली.यापैकी एकही व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा जनतेशी संपर्क मोठ्या प्रमाणावर येतो.लोकप्रतिनिधी, अधिकारी,जनता यांच्याशी सतत संपर्कात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी एस.व्ही.मुन्याळ यांनी आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करा असे सांगितले होते.त्यानुसार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे वार्ता आणि माहिती खात्याचे उप संचालक गुरुनाथ कडबुर यांनी सांगितले.यावेळी डॉ.जयानंद धनवंत, डॉ.सुजाता निशाणदार,सविता कित्तूर आणि माधवी केंगेरी यांनी रक्तदाब,रक्त,टेम्परेचर आदींची तपासणी केली.यावेळी रेड क्रॉस संस्थेचे अशोक बदामी,डॉ.डी. एन.मिसाळे, तालुका आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ आणि स्वयंसेवक उपस्थित होते.