चिकोडी तालुक्यातील कोथळी गावाहून उपचारासाठी अपंग मुलाला बेळगावला मुलीसह आलेल्या मातेला मुलाचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील पैसे नव्हते.
मृतदेह गावकडे नेणे शक्य नव्हते.अशावेळी जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरांनी स्मशानपर्यंत मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय केली पण स्मशानात गेल्यावर लाकडे घेण्यासाठी देखील त्या माऊली कडे पैसे नव्हते.ही स्थिती पाहून रूग्णवाहिकेच्या चालकाने एका पत्रकाराला ही माहिती कळवली.त्या पत्रकाराने स्मशानात दाखल होऊन लाकडाची सोय केली.
अंत्यविधी झाल्यावर गावाकडे जायचे कसे हा प्रश्न उभा ठाकला.त्यावेळी मदत केलेल्या पत्रकाराने गाडीची सोय करण्याची तयारी दर्शवली.पण वाटेत पोलीस अडवण्याची शक्यता होती.म्हणून त्या पत्रकाराने जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरंगी यांच्याशी संपर्क साधून हकीकत सांगितली.
हकीकत ऐकून निंबरगी हे स्मशानकडे दाखल झाले आणि त्यांनी स्वतः गाडीची सोय करून त्या मातेला आणि तिच्या मुलीला गावाला पाठवण्याची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवले.