बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून रविवार पेठकडे पाहिले जाते. मात्र लॉक डाऊन काळात येथील परिस्थिती काही चिंताजनक बनत असल्याने रविवार पेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक व्यापाऱ्यांची गोची होत असली तरी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन मेपर्यंत रविवार पेठ बंद असणार असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा साहित्य खरेदी विक्रीचे कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लॉकडाऊन असूनही चार दिवस सुरू करण्यात आलेली रविवार पेठ आजपासून पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने सोमवारी घेतला. सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क न लावणे आणि गर्दी न करता मालाची खरेदी करा. अशा सुचना करून देखील व्यापारी आणि लोकांकडून नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे पोलिसांनी रविवार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
परिणामी आता रविवारपेठ 3 मे पर्यंत पूर्णता बंद राहाणार असून व्यापाऱ्यांनाही घरी बसावे लागणार आहे. गेल्या 34 दिवसापासून लॉकडाऊन सुरू असून या काळात जिवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा पुरविण्यायांना अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कोरोना विषाणू पसरण्याचा धोका निर्माण होत होता. याचा विचार करूनच पोलीस प्रशासनाने रविवार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागासह उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडील किराणा माल संपला होता. त्यामुळे रविवारपेठ सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने गुरूवारी 23 रोजी सायंकाळी रविवारपेठेतील होल्सेल दुकाने सुरू करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी दिली होती. पण यावेळी किरकोळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे रिटेल दुकाने सुरू ठेवण्याची मागणी पोलिसांकडे व्यापाऱ्यांनी केली. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेल्या दुर्लक्ष पणा या निर्णयाला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तीन पर्यंत तरी रविवार पेठ बंद ठेवण्याचा आदेश पोलिस प्रशासनाने घेतला आहे.