कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉक डाऊनमुळे बेळगाव जिल्ह्यात दारू विक्रीस परवानगी दिली जाणार नाही, असे जलस्त्रोत मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी जाहीर केले आहे. मंत्री जारकीहोळी यांच्या या वक्तव्यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील मद्यपींचे तोंडचे पाणी पळाले असून दारू विना कोरडा पडलेला त्यांचा घसा आणखीनच शुष्क झाला आहे.
जलस्त्रोत मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी लॉक डाऊनच्या काळात बेळगाव जिल्ह्यात दारू विक्रीस परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा फैलाव नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यातील लॉक डाऊन 14 एप्रिलला संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनच्या काळात दारू विक्रीला परवानगी देण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी नुकतेच सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दिलासादायक वक्तव्यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील मद्यपींमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र आता मंत्री जारकीहोळी यांच्या वक्तव्यामुळे समस्त मद्यप्रेमींमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लॉक डाऊनच्या काळात कोरोना विषाणूमुळे राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला याउलट दारूचे व्यसन असलेल्या तब्बल सुमारे 20 जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एमएसआयएलद्वारे मद्य विक्री करण्याविषयी चर्चा सुरू असल्याचे समजते. तथापि जलस्त्रोत मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मात्र बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन काळात दारू बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून दारू अभावी मद्यपी मंडळी गलितगात्र झाली आहेत. दारू मिळत नसल्याने कोरडे पडलेले त्यांचे गळे दारुसाठी तहानलेले आहेत. या परिस्थितीत मंत्री जारकीहोळी यांच्या वक्तव्याने बिचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी राज्यात 15 एप्रिलनंतर अंशता दारूबंदी उठवण्यावर विचार केला जात असताना बेळगाव जिल्ह्यात मात्र दारूबंदी ठेवणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया मद्यपींमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.