कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे “कंटेनमेंट झोन” अर्थात निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या येळ्ळूर गावातील नागरिकांच्या ज्या कांही समस्या असतील त्या प्रशासनाला सांगून सोडवल्या जातील. त्यांना कांहीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गावाबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अलीकडेच एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. परिणामी लॉक डाऊन बरोबरच जिल्हा प्रशासनाने येळ्ळूर गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. यासंदर्भात येळ्ळूर येथील समस्या आणि उपाय योजना जाणून घेण्यासाठी सोमवारी येळ्ळूर गावाला दिलेल्या भेटीप्रसंगी जि. पं. शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी उपरोक्त आवाहन केले. आपल्या भेटीप्रसंगी त्यांनी येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हाॅलमध्ये बैठक घेतली.
सदर बैठकीस येळ्ळूर ग्रामपंचायत कोर कमिटीचे सदस्य, वामन पाटील,राजू पावले, येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश दंडगी, पीडीओ अरुण नाईक, गावातील रेशन दुकानदार, आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होते. सामाजिक अंतराचा नियम पाळून पार पडलेल्या या बैठकीत आशा कार्यकर्त्या आणि रेशन दुकानदारांना परिणामकारक सेवा बजावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. येळ्ळूर गावातील नागरिकांच्या ज्या कांही समस्या असतील त्या प्रशासनाला सांगून सोडवल्या जातील. त्यांना कांहीही कमी पडू दिला जाणार नाही. “कोरोना”ला हरवायचे असेल तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गावाबाहेर पडू नये, असे आवाहन बैठकीअखेर गोरल यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रमेश गोरल यांच्या हस्ते सॅनीटायझर, मास्क आणि फेस शेडचे वाटप करण्यात आले. येळ्ळूरच्या निर्बंधित क्षेत्रातील लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. यामुळे गोरगरीब नागरिकांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनाच्या मदतीने लवकरच संबंधितांना घरपोच जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना दिली.लॉक डाऊन काळात कुणालाही मदत लागल्यास 9880608211 वर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.