रेल्वे स्टेशन रोड येथील हॉटेल्समध्ये कोरोना संशयित रुग्णांची काॅरन्टाईनची सोय करण्यास स्थानिक नागरिकांनी विशेष करून नारीशक्तीने केलेल्या तीव्र विरोधासमोर जिल्हा प्रशासनाने अखेर नमते घेतले आहे. त्याचप्रमाणे काॅरन्टाईन रुग्णांची अन्यत्र सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून रेल्वे स्टेशन रोड येथील तीन हॉटेल्समध्ये शहर आणि जिल्ह्यातील संशयित कोरोना रुग्णांची काॅरन्टाईनची सोय करण्यात येणार होती. तथापि याची कुणकुण लागताच रविवारी सकाळी हेमु कलानी चौक परिसरातील नागरिकांसह महिला आणि कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संखेने रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला. रेल्वे स्टेशन रोड येथील भरवस्तीत असणाऱ्या हॉटेल्समध्ये कोरोना संशयित रुग्णांना काॅरन्टाईन करण्यास तीव्र विरोध करत भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, कुलकर्णी गल्ली आदी हेमू कलानी चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाल्यामुळे रविवारी दुपारी कांही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी बंदोबस्तास असलेले पोलीस आणि नागरिकांत संघर्ष सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढून त्यांना शांत केले.
दरम्यान, हेमु कलानी चौक परिसरातील नागरिकांचा विशेष करून नारी शक्तीचा तीव्र विरोध लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी उशिरा कोरोना संशयित रुग्णांची रेल्वे स्टेशन रोड मार्गावरील हॉटेल्स ऐवजी अन्य ठिकाणी काॅरन्टाईनची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे हेमु कलानी चौक परिसरातील लोकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
अंगडी इन्स्टिट्यूट किंवा सुवर्ण सौध मध्ये क्वांरंटाइनची सोय का करू नये भर लोकवस्ती ऐवजी शहरा बाहेर करा अशी मागणी वाढू लागली आहे.