एकसंबा (ता. चिकोडी) येथील सीआरपीएफ कोब्रा बटालियनच्या कमांडोला मास्क न घातल्याच्या कारणावरून बेड्या ठोकल्या प्रकरणाची लष्करी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र आले आहे. यामुळे स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले असून त्यांच्याकडून हे प्रकरण मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा कमांडो सचिन सुनील सावंत हा सुट्टीवर एकसंबा येथे आपल्या घरी आला होता. गेल्या 23 एप्रिल रोजी सदलगा पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलीस आणि आणि सचिन सावंत यांच्यात मास्क वरून वादावादी होऊन उभयतांमध्ये झटापट झाली. याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येऊन सचिन याला बेड्या ठोकून साखळदंडात बांधून ठेवण्यात आले होते. याची गंभीर दखल सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन सैन्य दलातील जवानाला अपमानकारक वागणूक दिल्याचे खरमरीत पत्र राज्य पोलीस संचालकांना लिहिले आहे. कोब्राचे कमांडो हे आपले जीव धोक्यात घालून कोठवर सेवा बजावून सुट्टीवर जातात. ही नियमित प्रक्रिया आहे, असे असताना एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सचिन सावंतला बेड्या घालून नेण्यात आले असल्याचा उल्लेख पत्रात आहे.
दरम्यान, पोलिस आणि सीआरपीएफ या दोन्ही दलाच्या एकत्र समन्वयाने अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तथापि आता एकसंबा येथील प्रकरणामुळे पोलिस आणि सीआरपीएफ यांच्यातील समन्वयाला तडा जाण्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तशा आशयाचे त्यांचे पत्रही व्हायरल झाले आहे.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. वरिष्ठ पातळीवरील या सर्व घडामोडींमुळे सदलगा पोलिसांनी खुलासा देऊन प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आटापिटा चालविला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान जामिनावर मुक्तता मिळालेल्या कमांडो सचिन सावंत याला कारागृहातून थेट जांबोटी येथील कोब्रा बटालियनच्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी नेण्यात आले आहे.