कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत लाभार्थीनी शुक्रवार दि. 3 एप्रिलपासून त्यांच्या नांवे बँकेत जमा झालेले पैसे काढण्यास हरकत नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत बँकांचा अंतर्भाव जीवनावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही. यांनी गुरुवारी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) संदर्भात बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पीएमजेडीवाय अकाउंट होल्डर महिलांना पीएमजीकेपी अंतर्गत प्रत्येकी 500 रुपये मिळणार आहेत. सदर पैसे लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तेंव्हा ज्या लाभार्थींच्या बँक खात्याचा शेवटचा क्रमांक शून्य आणि एक असेल त्यांना शुक्रवार दि. 3 एप्रिल 2020 रोजी बँकेतून पैसे काढता येणार आहेत. त्याच प्रमाणे ज्यांच्या बँक खात्याचा शेवटचा क्रमांक 2 आणि 3 असेल त्यांना 4 एप्रिल रोजी, ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक 4 आणि 5 असेल त्यांना 7 एप्रिल रोजी, ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक 6 आणि 7 असेल त्यांना 8 एप्रिल रोजी आणि ज्यांच्या बँक खात्याचा शेवटचा क्रमांक 8 व 9 असेल त्यांना 9 एप्रिल रोजी आपल्या खात्यातून पाचशे रुपये काढता येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
याखेरीज लाभार्थींना येत्या 9 एप्रिल 2020 नंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही बँकेतून आपले 500 रुपये काढता येणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित लाभार्थी यासाठी नजीकच्या एटीएमचा वापर करू शकतात अथवा बँक व्यवसाय प्रतिनिधीची मदत घेऊ शकतात. पीएमजीकेपी अंतर्गत मिळणारे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार असल्याने ते सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे लाभार्थींनी घाई न करता सवडीने बँकेतून पैसे काढावेत, असे आवाहन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही. यांनी केले आहे.
यासंदर्भात बँक शाखांमध्ये जर गर्दीमुळे आवश्यकता भासल्यास पोलीस अथवा होमगार्ड पुरविले जातील. बँक शाखा ना कोणत्याही प्रकारचे सहाय्य हवे असल्यास त्यांनी स्थानिक प्रशासन आणि एल डी एम च्या संपर्कात राहावे असे आवाहनही जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या उपरोक्त बैठकीस विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.