कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर देशामध्ये बुधवार दि. 15 एप्रिलपासून येत्या रविवार दि 3 मे 2020 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 19 दिवसांचा लॉक डाऊन जारी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोनासंदर्भात बुधवार दि. 20 एप्रिल 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी देशाला उद्देशून बोलताना उपरोक्त घोषणा केली. यावेळी कोरोना विषाणूंवर मात करण्याची आपली 7 सूत्रे देखील त्यांनी जाहीर केली. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनचे नियम पहिल्यापेक्षा अधिक कडक असणार असून ज्याठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळणार नाहीत त्याठिकाणी 20 एप्रिल नंतर थोडी सवलत दिली जाणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आला कशाप्रकारे हाताळले जात आहे, कोरोनाला आळा घालण्यात कितपत यश मिळत आहे हे पाहण्यासाठी प्रत्येक राज्यावर विशेष करून हॉटस्पॉट क्षेत्रावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतरच उपरोक्त सवलत दिली जाणार आहे.
लॉक डाऊनच्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे. नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून येणार नाहीत अर्थात आणखी नवी हॉटस्पॉट क्षेत्र निर्माण होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी. कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी देशात 220 प्रयोगशाळा स्थापण्यात आल्या असून 600 हून अधिक हॉस्पिटल्स फक्त कोव्हीड-19 अर्थात कोरोना उपचारासाठी कार्यान्वित केली गेली आहेत, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले.
वयस्कर लोकांची खास काळजी घ्या, लाॅक डाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करा – मास्कचा वापर करा, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे उपाय अंमलात आणा, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य सेतु मोबाईल ॲप डाऊनलोड करून घ्या, गोरगरीब लोकांची काळजी घ्या त्यांना अन्नपाणी द्या, कोणालाही नोकरीवरून काढू नका आणि कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस आदी कोरोना योद्ध्यांचा सन्मान राखा ही 7 सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहेत. या सात सूत्रांचा अवलंब केल्यास आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.