सध्याच्या लाॅक डाऊनमुळे मुक्या प्राणी-पक्ष्यांच्या अन्नपाण्याची समस्या लक्षात घेऊन कर्नाटक ॲनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्य डॉ. सोनाली सरनोबत यांनी शुक्रवारी पाळीव प्राणी – पक्षी विक्री करणाऱ्या शहरातील सर्व दुकानांचे सर्वेक्षण केले.
सध्या लाॅक डाऊनमुळे बाजारात विक्रीला ठेवलेल्या पाळीव प्राणी पक्ष्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात डॉ सोनाली सरनोबत यांनी शुक्रवारी शहरातील प्राणी – पक्षी विक्री करणाऱ्या प्रत्येक दुकानाला भेट देऊन पाहणी केली.
तसेच विक्रीसाठी ठेवलेले पाळीव प्राणी त्यांच्या – त्यांच्या मालकाच्या ताब्यात पालन पोषणासाठी सुपूर्द केले. सध्या या दुकानांमधील जलचर अर्थात मासे, कासव आदी आणि पक्षांची अवस्था मध्यम स्वरूपाची असून त्यांना जेमतेम खाद्य उपलब्ध होत आहे.
आपल्या भेटीप्रसंगी डॉ. सरनोबत यांनी संबंधित दुकानाचे लायसन्स आणि परवानगी संदर्भातील कागदपत्रांची पाहणी केली त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पुरेसा प्रकाश, वातानुकलता आणि प्राणी पक्षांना व्यवस्थित अन्नपाणी दिले जाते की नाही? याचीही शहानिशा केली. याप्रसंगी बार्कचे ( प्राणी बचाव व पालन-पोषण बिगर सरकारी संघटना) सदस्य उपस्थित होते यावेळी सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले होते.