कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे गेल्या 26 मार्चपासून बंद असलेली पोस्ट कार्यालये आज शुक्रवारपासून सुरू झाली आहेत. परिणामी पेन्शनधारकांनी आपल्या पेन्शनसाठी पोस्टासमोर गर्दी करून मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सध्या वृद्धापवेतन, संध्या सुरक्षा, विधवा वेतन आदी योजनांच्या लाभार्थी पेन्शनधारकांची पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तथापि गेल्या 26 मार्चपासून पोस्ट कार्यालय बंद असल्यामुळे पेन्शन अभावी पेन्शनधारकांची आर्थिक ओढाताण सुरू होती. याची दखल घेऊन शुक्रवार 3 एप्रिलपासून पोस्ट कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. याची माहिती मिळताच शुक्रवारी पोस्ट कार्यालयासमोर पेन्शन धारकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
शहर आणि उपनगरातील पोस्ट कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळपासून पेन्शन घेण्यासाठी नागरिक नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.
पोस्टासमोरील झालेल्या गर्दीसंदर्भात भारतनगर वडगाव येथील पोस्टमास्तर सय्यद यांनी शुक्रवारी स्वतः पुढाकार घेऊन पेन्शनधारकांना गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना केली. तसेच पेन्शन देण्यासाठी दोन काऊंटरची आणि विशेष कुपनची व्यवस्था देखील करून दिली आहे. दरम्यान, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट खात्याने पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन घरपोच मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.