दारू मिळत नाही म्हणून एका युवकाने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी भेंडीगिरी चाळ अनगोळ येथे उघडकीस आली.
देवेंद्रप्पा नीलकंठप्पा हडपद (वय 42, भेंडीगिरी चाळ अनगोळ) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्रप्पा हा अनगोळ येथील एका हेअर कटिंग सलूनमध्ये काम करीत होता. तो मूळचा सौंदती येथील रहिवासी असून भेंडीगिरी चाळीमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता.
लॉक डाऊनमुळे गेल्या आठ दिवसापासून हेअर कटिंग सलून बंद आहे. परिणामी सलून मालकाकडे नाष्टा व जेवण करून तो खोलीतच राहत होता. दारू दुकाने बंद झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्याने आपल्या मालकाकडे दारू मिळवून द्या, असा तगादा लावला होता.
दारू न मिळाल्याने देवेंद्रप्पा यांची अस्वस्थ ता वाढली होती. या अस्वस्थतेमधूनच मंगळवारी मध्यरात्री त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. बुधवारी सकाळी त्याला नाश्त्यासाठी उठवण्यास गेलेल्या सलून मालकाला त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. देवेंद्रप्पा याने चार ओळीची चिठ्ठी लिहिली असून दारू मिळत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.