कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आपल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने भाजीपाला घरपोच देण्यासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली असली तरी वयोवृद्ध नागरिकांसाठी ही व्यवस्था त्रासदायक ठरत आहे. तेंव्हा किर्लोस्कर रोड येथे ठराविक वेळेत संबंधित वाहने थांबून भाजीपाल्याची विक्री करावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा एक उपाय म्हणून फिरती भाजीपाला विक्री दुकाने सुरू करण्यात आली आहेत. रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, केळकर बाग, मारुती गल्ली कॉर्नरसह शहरातील गल्लीबोळात फिरणाऱ्या या भाजीपाला विक्री वाहनातील विक्रेते मास्क आणि हँडग्लोज न वापरता सर्वत्र अस्वच्छता पसरवत असतात. शहरात अनेक अपार्टमेंट्स असून त्यामध्ये वयोवृद्ध मंडळी राहतात. या वयोवृद्ध लोकांना जवळपास रिलायंस मार्ट अथवा भाजीपाल्याचे दुकान नसल्यामुळे फिरत्या वाहनातील भाजीपाला खरेदी करण्यासाठी अपार्टमेंटमधून खालीवर ये – जा करणे त्रासदायक होत आहे.
वाढत्या वयामुळे या मंडळींना अपार्टमेंटमधून झटपट खाली येता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा भाजी विक्रीचे वाहन पुढे निघून गेलेले असते. यासाठी गल्लीबोळात फिरून भाजीपाल्याचा कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या संबंधित फिरत्या भाजी विक्रेत्यांना मास्क व हॅन्डग्लोज घालून किर्लोस्कर रोडवर सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत एकमेकांमध्ये किमान 20 फुटाचे अंतर ठेवून एका ठिकाणी भाजीपाला विक्री करण्याची सक्त सूचना जिल्हाधिकार्यांनी करावी, अशी शहरातील वयोवृद्ध मंडळींची मागणी आहे.