कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी प्रसाद मुचंडी यांचे उस्फुर्त सहाय्य-वाढदिवस म्हणजे हौस मौज करणारा दिवस. मात्र सध्या देशभरात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्याऐवजी पंतप्रधान सहायता निधीला 51 हजार रुपये देऊन आपला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करावे तितके कमी आहे.
फुलबाग गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक प्रसाद मुचंडी यांचा पुतण्या आरव अरविंद मुचंडी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान सहाय्यता निधी आणि जीवनावश्यक साहित्य वाटप यासाठी प्रत्येकी 51 हजार रुपयांची देणगी देऊ केली आहे. सदर देणगीचे धनादेश त्यांनी शनिवारी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्याकडे सुपूर्द केले.
फुलबाग गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि दानशूर व्यक्ती प्रसाद मुचंडी हे कोरोना विषाणु विरुद्धच्या देशव्यापी लढ्यास सहकार्य करण्यास पुढे सरसावले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आपले बंधू अरविंद मुचंडी यांचा मुलगा आरव याच्या 26 एप्रिल रोजी साजरा केल्या जाणाऱ्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त प्रसाद मुचंडी आणि त्यांच्या पत्नीने देशाच्या पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजार रुपयांची देणगी देऊ केली आहे. त्याचप्रमाणे लॉक डाऊनमुळे गरीब गरजू नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले जावे यासाठी 51 हजाराची देणगी दिली आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. उपरोक्त देणगीचे धनादेश शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रसाद मुचंडी यांच्यासह त्यांचे हितचिंतक आणि पाठीराखे उपस्थित होते. आपल्या उत्तर मतदारसंघातील गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांनी प्रसाद मुचंडी त्यांना धन्यवाद दिले आहेत.