राज्य शासनातर्फे आज सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार आणखी नव्या 8 रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 511 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 20 इतकी वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी समाधानकारक बाब म्हणजे आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही.
राज्यशासनाने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार काल रविवार 26 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून आज सोमवार 27 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात 8 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमध्ये एका 13 वर्षीय मुलासह तीन महिलांचा समावेश आहे. या आठ कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बागलकोट (जमखंडी), मंगळूर व विजयपुरा येथील प्रत्येकी 2 तसेच बेंगलोर शहर व मंड्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचारअंती पूर्णपणे बऱ्या झालेल्या राज्यातील 188 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना बाधितांपैकी बेंगलोर शहरातील एका रुग्णाचा उपचाराचा फायदा न होता सोमवारी मृत्यू झाला. यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20 झाली आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे हिरेबागेवाडी येथे एकाच दिवसात 9 रुग्ण सापडल्याने दबावाखाली आलेल्या जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याला थोडा दिलासा मिळाला आहे. नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे सध्या बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्या 54 इतकी स्थिर आहे.