लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर खडक गल्ली येथील विश्वजीत चौगुले, संजय जाधव आणि राकेश पोरवाल या तीन सेवाभावी युवा कार्यकर्त्यांचा गोरगरिबांचासह कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आपल्यापरीने सर्वतोपरी मदत करण्याचा उपक्रम आज सोमवारी देखील सुरूच होता. महावीर जयंतीनिमित्त सोमवारी त्यांनी 500 लाडूंचे वाटप केले.
खडक गल्ली येथील विश्वजीत चौगुले, संजय जाधव आणि राकेश पोरवाल या धडाडीच्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी महावीर जयंतीनिमित्त सोमवारी पोलिसांसह रेल्वे स्टेशन येथील भिकारी, श्रीनगर आणि गणेशपूर येथील डोंबारवाडा याठिकाणी एकूण 500 लाडूंचे वाटप केले. याव्यतिरिक्त लॉक डाऊन सुरू झाल्यापासून प्रारंभ केलेला गोरगरीब गरजुंना अल्प अपहार व भोजन देण्याचा आपला उपक्रम या तिघा युवकांनी आजही सुरू ठेवला होता.
विश्वजीत चौगुले, संजय जाधव आणि राकेश पोरवाल यांनी सोमवारी रेल्वे स्टेशन येथील भिकारी, श्रीनगर आणि गणेशपूर येथील डोंबारवाड्यातील रहिवाशांना लाडवांबरोबरच पुलाव वाटपही केले.
त्याचप्रमाणे गणेशपूर डोंबारवाड्यातील रहिवाशांना भाजीसाठी 100 कोबी गड्डे मोफत देण्याबरोबरच 1 क्विंटल तांदूळ खरेदीसाठी 3 हजार रुपये रोख देऊ केले. लॉक डाऊन सारख्या कठीण परिस्थिती उपरोक्त तिघा युवा कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.