कर्नाटक सरकारने आर्थिक प्रबलता वाढवण्यासाठी एक नवीन आदेश काढला आहे. या आदेशामध्ये विविध व्यवसायांना सवलत देण्यात आली असून कंटेनमेंट झोन परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणाची सर्व व्यवहार बंद असणार आहेत मात्र इतर ठिकाणी मात्र काही प्रमाणात सवलती देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कंटेनमेंट झोन ज्या ठिकाणी लागू आहे त्याठिकाणी कोणत्याही हॉटेल चालकांना अथवा तिथे जेवण देण्याची मुभा नाही, होम डिलिव्हरी असेल, बस वाहतूक नसेल, सर्व शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, रिक्षा, मॉल सिनेमा थिएटर, शॉपिंग मॉल, मंदिर मस्जिद यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याच बरोबर कंटेनमेंट झोनमध्ये किंवा इतर ठिकाणी कोणतीही व्यक्ती मरण पावल्यास केवळ वीस व्यक्तींनी त्यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून अंत्यसंस्कार करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोन मध्ये असणाऱ्या अनेक उद्योग व्यवसायांना बंदी घालण्याचा हा निर्णय आणखी काही दिवस चालणार आहे.
तर कंटेनमेंट झोन सोडून इतर ठिकाणचे दवाखाने, औषध दुकाने, रक्तपेढ्या, शेती अवजारे असणारी दुकाने, शेती व्यवसाय यातील सर्व कामे, एपीएमसी मार्केट, दूध, पोल्ट्री फार्म, आरबीआय अंतर्गत येणाऱ्या बँक एटीएम, वृद्धाश्रम, ऑनलाइन शिक्षण पद्धत, केबल, वृत्तपत्रे, कोल्डस्टोरेज, खासगी सुरक्षारक्षक, बांधकाम, रस्ते, औद्योगिक वसाहतीमधील बांधकाम यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रस्त्यांची कामे आदी कामांना चालना देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे काहींना दिलासा तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये वरील नियम 3 मे पर्यंत लागू असणार आहेत. त्यानंतर पुन्हा राज्य सरकार एक नवीन अध्यादेश काढून पुन्हा शिथिलता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सध्या तरी कंटेनमेंट झोन बाहेरील काही व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवूनच सर्व व्यवसायाने कामे करावीत असे देखील या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे काही प्रमाणात आर्थिक सुलभता आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.