सध्या लॉक डाऊनच्या फावल्या वेळेत विविध छंद जोपासणारे अनेक जण आहेत. निलजी (ता. बेळगाव) येथील संजय मुरारी आणि अमर मोदगेकर हे दोघे प्रतिभावंत युवा अभियंते अशाच लोकांपैकी एक असून त्यांनी रेखाटलेली ख्यातनाम उद्योजक रतन टाटा यांची रांगोळी सध्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
बेळगाव तालुक्यातील निलजी येथील संजय मुरारी हा चेन्नई येथील फोर्ड मोटर्स या कंपनीत डिझाईन इंजिनियर आहे. तसेच गावातील त्याचा मित्र अमर मोदगेकर हा पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) त्या कंपनीत कामाला आहे. जिवलग मित्र असलेल्या या जोडगोळीला रांगोळी काढण्याचा छंद आहे. सध्या देशव्यापी लॉक डाऊनमुळे हे दोघे वर्क फ्रॉम होम अर्थात घरातूनच आपले कंपनीचे काम करत आहेत. कामाचा ताण घालवण्यासाठी फावला वेळ काढून या उभयतांनी भारताचे जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची हुबेहूब रांगोळी काढली आहे.
सदर रांगोळी रेखाटण्यासाठी सुमारे 8 ते 9 तास लागल्याचे संजय मुरारी यांने सांगितले. प्रत्येक बारकाव्यांसह हुबेहूब रेखाटण्यात आलेली ही रांगोळी सध्या निलजी परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. संजय व अमर यांनी यापूर्वी छंद म्हणून आंतरराष्ट्रीय मल्ल अतुल शितोले, सुप्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन आदी मान्यवर व्यक्तींच्या रांगोळ्या काढल्या आहेत.