बेळगाव जिल्ह्यातील लॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे ऊल्लंघन करणार्या व्यक्तींकडून गुरुवारी एका दिवसात 42 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मास्क न घालता घराबाहेर पडणे तसेच रस्त्यावर थुंकणे हे लॉक डाऊन च्या नियमांमध्ये गुन्हा आहे, असे असतानाही अनेकांनी मास्क न घालता घराबाहेर पडल्याचे लक्षात आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन करू नये तसेच मास्क घालून घराबाहेर पडावे आणि रस्त्यात थुंकू नये अन्यथा दंड भरावा लागेल असा इशारा पोलीस प्रमुख यांच्याकडून दिला गेला आहे.