मोबाईल ही सध्या काळाची गरज बनली आहे. मात्र लाॅक डाऊनमुळे मोबाईल दुरुस्ती आणि रिचार्ज करून घेणे अवघड बनले असल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मोबाईल विक्री व दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
शहर आणि परिसरात मोबाईल खरेदी आणि दुरुस्तीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. तथापि आता गेल्या तीन आठवड्यापासून मोबाईलची सर्व दुकाने बंद असल्याने मोबाईल दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. तसेच लाॅक डाऊन जारी होण्यापूर्वी ज्यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी दिला होता त्यांची तर मोठी अडचण झाली आहे. उपनगरांमधील मोबाईलची दुकाने कांही वेळासाठी सुरु करून बंद होत आहेत. मात्र शहरी भागातील मोबाईल दुरुस्ती आणि विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद आहेत.
जून महिन्यात महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थी कमी अधिक प्रमाणात मोबाईल खरेदी खरेदी करतात. त्यामुळे मे महिन्यात मोबाईल दुकानदार नवनव्या मोबाईलसह अन्य साहित्य विक्रीसाठी आणून ठेवतात. परंतु यंदा लाॅक डाऊनमुळे व्यवहार ठप्प झाल्याने मोबाईल विक्रेत्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. अनेकजण गूगल पे, फोन पे आदींच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज वर भर देत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ऑनलाइनद्वारे रक्कम पे करण्याची सुविधा नाही त्यांना मात्र मोबाईल रिचार्ज करण्यास अडचण येत आहे.