कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात काल बुधवार दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते आज गुरुवार दि. 16 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 34 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 17 जणांचा समावेश आहे.
कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आपल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली असून आज गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 313 झाल्याचे नमूद केले आहे. काल बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गेल्या 19 तासात राज्यात नव्याने आढळून आलेल्या 34 कोरोना बाधित रुग्णांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 17 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उर्वरित रुग्णांमध्ये बेंगलोर शहरातील 5, म्हैसूर 3, विजयपुरा 7 आणि कलबुर्गी व गदग येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील नव्याने आढळून आलेल्या 17 कोरोना बाधित रुग्णांमध्ये हिरेबागेवाडी येथील दोन पुरुष (वय 42 व 33 वर्षे) आणि पांच महिलांचा (वय 51,16, 65, 30 व 58) समावेश आहे. त्याचप्रमाणे रायबाग येथील सात पुरुष (वय 25, 30, 43, 50, 35, 25 व 64) कोरोना बाधित आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त उपरोक्त 17 जणांमध्ये बेळगावातील एका महिलेसह (वय 45) बागेवाडी व चिकोडी येथील प्रत्येकी एका पुरुषाचा (वय 54, 47) समावेश आहे.
रायबाग येथील कोरोनाग्रस्तांपैकी 50 वर्षीय हा मुळचा गोव्याचा आहे, त्याचप्रमाणे एक 25 वर्षीय युवक मुळचा मिरज – महाराष्ट्र येथील आणि 35 वर्षीय युवक मुळचा विजापूर येथील आहे.