कर्नाटक राज्य शासनातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार काल सायंकाळपासून आज रविवार दि. 26 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात फक्त 1 महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 501 इतकी झाली आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने आढळून आलेली कोरोना बाधित पी – 501 क्रमांकाची महिला रुग्ण ही मंगळूर येथील पनेमंगलोर या ठिकाणची रहिवासी आहे. सदर महिला पी – 432 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधीत झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी दुपारपर्यंत नव्याने फक्त एका रुग्णाची भर पडल्यामुळे ही बाब राज्य शासनासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यासाठी दिलासादायक ठरली आहे.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूरात सर्वाधिक 133 जणांना कोरोनाची बाधा झाली असून शनिवारी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेंगलोर खालोखाल म्हैसूर जिल्ह्यातील 89 जणांना तर बेळगाव जिल्ह्यातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकंदर राज्यात आतापर्यंत 501 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला असून 177 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.