कोरोनाचे संकट आणि लॉक डाऊनची लक्ष्मण रेषा यामुळे सर्वसामान्य जनतेचे हालबेहाल होऊ लागले आहेत. अशा अडचणीत काळात गरीब गरजूंना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत. मात्र, यामध्येही गेल्या महिन्याभरापासून जीवनदीप फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले निरंतर कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. दररोज किमान 500 गरिबांना दुपारचे जेवण देण्याचे काम करणाऱ्या जीवनदीपच्या कार्यकर्त्यांनी काल गुरुवारी शहरापासून दूर असलेल्या गणबैल परिसरातील वीटभट्टी कामगारांना जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरपोच देण्याचे मोलाचे काम केले आहे.
गेला महिनाभर लॉक डाऊन काळात जीवनदीपच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सेवा, एक व्रत म्हणून हाती घेतले आहे. गरज जिथे, आम्ही तिथे….. या तत्वाने जीवनदीपचे कार्य सुरू असते. गेल्या वर्षीच्या महापूरातही जीवनदीपच्या कार्यकर्त्यांनी अनेक उपक्रम पार पडले होते. त्या अनुभवाच्या जोरावर यावेळी कोरोना संकटाच्या काळात अडचणीत असलेल्या गरीब गरजूंची माहिती घेऊन त्यांच्या एक वेळच्या जेवणाची व्यवस्था जीवनदीपचे कार्यकर्त्ये करत आहेत.
दररोज टिळकवाडी साई मंदिरच्या मारुती मंदिरात माजी नगरसेवक मोहन चिगरे यांचे सहकार्य आणि माजी नगरसेवक किरण परब यांच्या मार्गदर्शनाखाली 500 जणांचा स्वयंपाक बनवला जातो. बनविलेला स्वंयपाक घेऊन कार्यकर्ते, सिव्हिल हॉस्पिटल, बस आणि रेल्वे स्थानक, विविध ठिकाणच्या झोपडपट्टी अशा भागात जाऊन भुकेलेल्यांना भोजन देत आहेत. केवळ जेवणच नाही तर, अत्यंत हालाखीच्या दिवस जगत असलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे कामही जीवनदीपच्यावतीने केले जात आहे.
काल गुरुवारी सर्वत्र भोजन वितरण करून आल्यानंतर, मिळालेल्या माहिती नुसार, जीवनदीपच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरापासून दूर असलेले गणेबैल गाव गाठले. गणेबैल परिसरातील वीटभट्टी कामगारांना त्यांच्या राहत्या जागेपर्यंत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. शहरापासून दूरवरून त्या गरजूंना केलेली मदत नक्कीच मोलाची आहे.
गेल्या महिनाभरापासून निरंतर सुरू असलेल्या सेवाभावी कार्यात माजी नगरसेवक किरण परब, मोहन चिगरे, राजू वर्पे, सुनील बोकडे, किशोर गवळी, सागर भोसले, रवी धनुचे, श्रीकांत धनुचे,भाऊ गुंडपण्णावर, सुरज गवळी, विनायक देसाई, शैलेष दुभाषी, नंदकुमार पाटील, किसन पाटील, सागर पाटील, किरण गवळी, सुधीर ढवळे, राम घोरपडे, संतोष वर्पे, शशिकांत खासबाग, भूषण बोकडे, कृष्णा गवळी, संजय परब, बाबाजी राऊळ, राजेश सावजी, मारुती धनुचे किसन जुवेकर, जयराम शिंदे आदी सदस्य रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.