अनेक संस्था मदतकार्यासाठी पुढे येत असताना काही अवैधरित्या तांदूळ साठा साठविण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहापूर पोलिसांनी या प्रकरणी एका युवकाला अटक केली आहे. वडगाव परिसरात हा साठा साठवून ठेवण्याचे उघडकीस आले होते.
लियाकत कासिमसाब शहा वय 41 राहणार देवानगर वडगाव असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. अचानक धाड टाकून त्याच्या जवळून 15 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आले आहे.
देवानगर वडगाव येथील एका किराणा दुकानात अवैधरीत्या 15 क्विंटल तांदूळ साठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने धाड टाकून ते तांदूळ जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तांदूळ साठा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली असून ही कारवाई असेच सुरु होणार असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे अनेकांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. अशा परिस्थितीत तांदूळ साठा करून तो डबल दराने विक्री करण्याचा घाट पोलिसांनी हाणून पाडला आहे. गोरगरिबांना रेशनकार्डावर वेळेत धान्य मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने धान्य पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे अवैधरित्या तांदूळ साठा करून गरिबांना उपाशी मारण्याचे काम अशा दुकानदारांनी सुरू केले आहे. त्यांची गय केली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या पत्रकात असे साठे करणाऱ्यांवर कारवाई अशीच सुरू राहणार असे म्हटले आहे.