लॉक डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर शहरातील कांही ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन बेळगाव महापालिका आणि पोलीस खात्यातर्फे शहरातील 14 ठिकाणे हॉटस्पॉट ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले नसले तरी खबरदारीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही ठिकाणे सील डाऊन केली जाणार आहेत. या सील डाऊन मोहिमेला काल शनिवारी शहापूर तांबीट गल्ली येथून प्रारंभ झाला आहे.
लॉक डाऊन समाप्त झाल्यानंतर शहरातील कांही घनदाट लोकवस्तीच्या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. शहरातील अशी 14 ठिकाणे महापालिका व पोलिस खात्याने हॉटस्पॉट म्हणून निवडली आहेत. हि हॉटस्पॉट ठिकाणे लाॅक डाऊन समाप्त झाल्या- झाल्यानंतर सील डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि या निर्णयात बदल करण्यात आला असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव शहरातील सर्व हॉटस्पॉट सील डाऊन करण्याची मोहीम शनिवारी अकाली हाती घेण्यात आली आहे.
शहापूर येथील तांबीटकर गल्लीतून या मोहिमेला प्रारंभ झाला. महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता रविवारी शहराच्या उत्तर भागात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे सदर हॉटस्पॉट मधील नागरिकांना आता निर्बंधित क्षेत्राप्रमाणे (कंटेनमेंट झोन) आपल्या घरातच थांबून राहावे लागणार आहे. या हॉटस्पॉट प्रदेशात कोणालाही आत – बाहेर प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी बॅरिकेड टाकून संबंधित ठिकाणांचे सर्व प्रवेश मार्ग बंद केले जाणार आहेत. या 14 ठिकाणी कोरोना रुग्ण नसले तरी खबरदारी म्हणून तेथे सील डाऊनची प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. सील डाऊन भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या 4 सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे या हॉट स्पाॅटसची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कसाई गल्ली, माळी गल्ली, कामत गल्ली, आझाद गल्ली, शाहूनगर, रुक्मिणीनगर, संगमेश्वरनगर, तांबीटकर गल्ली, गवळी गल्ली टिळकवाडी, निजामुद्दीन चौक, कोतवाल गल्ली, खंजर गल्ली, बागवान गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, काकर गल्ली, न्यू गांधिनगर, उज्वलनगर, अमननगर, मारुतीनगर, तिरंगा कॉलनी, आझादनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, गॅंगवाडी, वड्डरवाडी, रामनगर, अनगोळ व मजगाव शाळा क्रमांक 19 परिसर या भागांचा शहरातील 14 हॉटस्पॉट ठिकाणांमध्ये समावेश आहे.